- Back to Home »
- Religion / Social »
- शहर स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात मनपाच्या एक तारीख,एक तास,एक साथ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद...
Posted by : achhiduniya
01 February 2024
नागपूर:स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले असून, मनपाद्वारे राबविण्यात येणाऱ्या एक तारीख, एक तास, एक साथ उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्वच्छता कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवार १ फेब्रुवारी रोजी “एक तारीख-एक तास एक साथ” उपक्रम राबविण्यात आला. शहराच्या गुलाबी थंडीत शेकडोच्या संख्येत नागरिक हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले, स्वयंस्फूर्तीने श्रमदान करीत स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर शहर साकारण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. मनपाच्या दहाही झोन
मधील नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्रमदान केले.मनपाचे घनकचरा विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी नेहरूनगर झोन प्रभाग २८ येथील आदर्श नगर बौद्ध विहार जवळ श्रमदान केले. या उपक्रम तेजस्विनी महिला मंच सह विविध स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले. तसेच मनपाच्या दहाही झोन मधील विविध ठिकाणी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यात लक्ष्मीनगर झोन येथील नवनिर्माण कॉलनी, प्रभाग ३७, धरमपेठ झोन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, मुख्य रस्ता, प्रभाग १४, हनुमाननगर झोन येथील महात्मा फुले वसाहत, प्रभाग ३४, धंतोली झोन येथील अविनाश खेळाचे मैदान, रेल्वे डेपो, प्रभाग ३३, नेहरूनगर झोन येथील आदर्श नगर, बुद्ध विहार, रामणा मारोती मंदिराजवळ, प्रभाग २८, गांधीबाग झोन येथील बिंझाणी कॉलेज रोड ते दक्षिणामूर्ती
परिसर, प्रभाग १८, सतरंजीपुरा झोन येथील बस्तवारी मनपा शाळा, झोन कार्यालयाजवळ, प्रभाग क्र.२१, लकडगंज झोन येथील गुलमोहर नगर, भरतवाडा रोड, प्रभाग ४, आशीनगर झोन येथील कमाल बाजार, कमाल टॉकीज समोर, प्रभाग ७, मंगळवारी झोन येथील CID कार्यालयाजवळ, प्रभाग १० येथे नागरिकांनसह सफाई कर्मचाऱ्यांनी अस्वच्छ परिसराची साफसफाई करुन परिसर स्वच्छ केला. रस्त्यावरील पालापाचोळा, झाडाच्या फांद्या आदी उचलून कचरा गाडीत टाकण्यात आले. तसेच स्वच्छ करण्यात आलेला परिसर पुन्हा अस्वच्छ होवू नये, लोक तिथे पुन्हा कचरा टाकू नये म्हणून त्या ठिकाणी संबंधित झोनचे सहायक आयुक्त यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी या सर्वांनी स्वच्छतेसाठी श्रमदानाच्या या उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदविला. प्रत्येक झोन मध्ये घनकचरा विभागाने झोनल अधिकारी,सॅनेटरी इंस्पेक्टर व सफाई कर्मचारी सोबत एन.जी.ओ. चे
प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.