- Back to Home »
- State News »
- रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपूल तोडून प्रारूपानुसार कार्य करण्याचे गडकरींचे निर्देश
Posted by : achhiduniya
21 August 2018
नागपुर:-रेल्वे स्टेशनलगत जयस्तंभ चौकातील वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या उड्डाणपुलाचे बांधकाम तोडून त्या ठिकाणी सुधारित प्रारूपानुसार रस्ते बांधणी व मेट्रो रेल्वेस्थानकाचा आराखडा संबंधित यंत्रणानी त्वरित पूर्ण करून प्रत्यक्ष कार्यास सुरूवात करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी व केंद्रीय जलसंपदा नदी विकास, मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज दिले। नागपूर महानगर पालिकेच्या सभागृहात नागपूरातील विविध विकास कार्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते। याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दिक्षीत, जिल्हाधिकारी व नासुप्र सभापती अश्विन मुद्गल प्रामुख्याने उपस्थित होते। जयस्तंभ चौकातील रेल्वे स्टेशन लगत होणा-या रस्ते प्रकल्पासाठी 234 कोटी सी.आर.एफ. (सेंट्रल रोड फंड) अंतर्गत मंजूर झाले असून हा पुल पाडण्याचे ना हरकत प्रमाणपत्रही नागपूर महानगर पालिकेने महामेट्रोला दिले असून मेट्रोने छत्रपती नगर उड्डाणपूला प्रमाणे हा पूल पाडण्याची जबाबदारी घ्यावी।
मानस चौक ते रेल्वे स्टेशन लगत असणा-या मध्यप्रदेश बसस्थानकाची जागा अधिग्रहीत करून उड्डाणपूलाखालील दुकानदारांच्या योग्य पूनर्वसनाबाबतही मेट्रोने जिल्हाधिका-यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश यावेळी गडकरी यांनी दिले। संत्रा, कॉटन, खवा व गोल मार्केट यांचे एकत्रिकृत प्लानिंग करून त्याचाही अराखडा तयार करावा। अंबाझरी व फुटाळा येथील तलावामध्ये म्युझीकल फाऊंटनचे काम हे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाएवजी स्वत: नागपूर महानगरपालिकेने ते पूर्ण करावे या परिसरातील पार्कींगचा प्रश्नही महानगरपालिकेने सोडवावा.असे त्यांनी सांगितले। वर्धा रोडजवळील लंडनस्ट्रीटच्या कार्याबाबतची स्थिती जाणून घेतांना गडकरी यांनी प्रस्तावित लंडन स्ट्रिटच्या व्यावसायिक जागेत डॉक्टर्स, व्यापारी यांनी गाळे घेता यावे याकरिता बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले। सुमारे 2,500 कोटीचा हा प्रकल्प महामेट्रोने नामांकित कन्सट्रक्शन कंपन्याची मदत घेऊन ‘क्रान्ट्रॅक्ट टर्म’ वर पूर्ण करावा यासाठी आवश्यक तो निधी महामेट्रोला देण्यात येईल,अशी ग्वाही गडकरी यांनी दिली।
लंडन स्ट्रीटवर जयप्रकाश मेट्रो रेल्वे स्टेशन जवळ ‘मेट्रो मॉल’ बांधण्यात येणार असून त्यासाठी महानगरपालिकेला 200 कोटी रूपये बँक ऑफ महाराष्ट्राकडून मिळाले आहेत। या मॉलमध्ये व्यावसायिक , व्यापारीयांना किफायतशीर दरात व्यावसायिक जागा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिका-यांनी नियोजन करावे, असे गडकरी यांनी यावेळी सुचविले। ‘साई-स्पोर्टस ऑथारिटी ऑफ इंडिया’ साठी पूर्व नागपूरात 75 टक्के जागेचे अधिग्रहण पूर्ण झाले असून सी.एस.आर. अंतर्गत वॅप्कोस या केंद्रीय जल संसाधन मंत्रालयाच्या अंतर्गत असणा-या सार्वजनिक उपक्रम व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या संस्थेचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे। या संस्थेसाठी आपणही बँकाकडून सी.एस.आर. मार्फत निधी मिळवण्यास प्रयत्न करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले।
डब्लू.सी.एल.,मॉईल या उपक्रमानांही सी.एस.आर. मार्फत निधी ‘साई’ला दिला आहे. साईच्या उर्वरित 25 % जागेवर रेमंडचे मॉडेल स्कूलसाठी 8 एकर जागाही देण्यात यावी, अशी सूचना गडकरी यांनी केली। या आढावा बैठकीस पूर्व नागपूरचे आमदार श्री. कृष्णा खोपडे, महानगरपालिकेचे सत्ता पक्षनेता संदीप जोशी, स्थायी समीती सभापती विक्की कुकरेजा, महानगरपालिकेचे पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते।